Homeईपेपरदिवाळीचा निरोप.

दिवाळीचा निरोप.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 26/10/2025 .

      दीपावलीचा शेवटचा दिवस झाला. या दीपाबद्दल पूर्वजांनी जे काही एक प्रेम बाळगलं — प्रकाश; `'तमसो मा ज्योतिर्गमय।' 'अंधारातून मला प्रकाशाकडे ने',` हा टाहो फोडला पूर्वजांनी त्यांचा टाहो जो होता, तो त्या ज्ञानासाठी होता. मग आता, हे काही फक्त रूपकच नाहीय. ज्ञानाचा प्रकाश त्यांना पाहिजे होता. त्यासाठी ते तडफड तडफड करत होते. आणि म्हणून दिव्याचं महत्व त्यांनी एका निराळ्या पातळीवर नेऊन ठेवलं. प्रचंड पातळी त्यांनी निर्माण केली. दिवा हा साधा दिवा उरलाच नाही भारतीय संस्कृतीतः दिव्याचं दिव्य्य झालं. तेव्हा दिव्याचा चमत्कार हा दिव्य्याचा चमत्कार होऊन गेला. केवळ त्यांनी आपल्या ज्ञानाची उंची वाढवली, म्हणून. आपल्या भारतीय पूर्वजांनी ही मोठी कामगिरी केली. तर आता त्यांचं हे ऋण आम्ही त्याच ज्ञानाच्या पातळीवर जाऊन फेडायला पाहिजे, असं मला वाटतं. दिवाळीला नुसतेच दिवे आम्ही लावले आणि चार दिवस संपवून टाकले — नाही; काहीतरी निराळं आपल्याला करायलाच पाहिजे.

     माणसाला काय पाहिजे ? पराक्रम पाहिजे. नरकासुराच्या निमित्ताने पराक्रम केला. मग? पराक्रम नुसता करून चालणार नाही; गुणग्राहकताही पाहिजे. मग ती बलिच्या आदर्शाने निर्माण केली. चांगले सद्‌गुण पाहिजेत. बलिच्या निमित्ताने सद्गुण वाढवले त्यांनी. धन पाहिजे; म्हणून 'धनत्रयोदशी' आली. 'लक्ष्मीपूजन' आलं. प्रत्येकाच्यापुढे दिवे ओवाळले. आणि मग पहा कसं आहे ते. 'वसुबारस' आला. मुलाकडनं सुरूवात केली, पतीपाशी मुक्काम केला, आणि शेवटच्या दिवशी भावाची आणि बहिणीची भेट— ही सगळी नाती त्यांनी उत्तम तर्‍हेने गुंफून टाकली. तेव्हा समाज बांधला, पुढल्या पिढीची काळजी केली, मागल्या पिढीची काळजी केली, आणि चालू पिढीची काळजी केली. सगळ्यांना या पद्धतीने दीपावलीत त्यांनी गुंफून टाकलं. सगळ्या समाजाला आणि कुटुंबाला. असा हा दीप. आणि या सगळ्याला म्हणायचं दीपावली. प्रत्येक ठिकाणी दीपाचं महत्व आहे.

      का आहे या दीपाचं महत्व ? या दिव्याने काय तेज मिळतं ? धन का मिळतं ? पराक्रम का मिळतो? आणि तुम्हाला हवं ते का मिळतं ?

      मी लोकांना सांगतोय की, तुम्ही नुसतं प्रकाशावर जर एकाग्र झालात, तर तुम्हाला शक्ती जरूर मिळेल. प्रश्न एवढाच आहे, कोणच्या हेतूने तुम्ही एकाग्र होताय ? जर तुम्ही दुष्टपणासाठी एकाग्र झालात, शक्ती जरूर मिळून जाईल, पण ती सत्प्रेरणेवर विजय मिळवणारी कधीही होऊ शकणार नाही. कारण प्रत्येक वाईट हेतु, स्वतःचं मन खात असतो. निर्मळ मनाने, सत्प्रेरणा जी असते - दुसऱ्याचं काही चांगलं करावं - ही मोठी प्रेरणा आहे, त्यामुळे, त्या तिथे हेतु जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून मी नुसत्या प्रकाशावर एकाग्र होऊन चालणार नाही, तर चांगल्या हेतूने एकाग्र झालं पाहिजे. हेतुशुद्धतेचं पथ्य पाळलं की तुम्ही बदलतात. तुम्ही बदललात की, आतलं मन बदलेल. मन बदललं की परिस्थिती बदलेल.

      या पद्धतीने, आपल्याला 'दीप' नावाचं जे पवित्र साधन पूर्वजांनी दिलं, त्याचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे.
                               *— स्वामी विज्ञानानंद*

मनशक्ती ग्रंथ : ‘सणांचे सुक्ष्म सामर्थ्य’ मधून

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

RELATED ARTICLES

Most Popular