लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 12/3/2026
लातूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मुंबई येथील
पन्हाळगड या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस महायुतीचे नेते तथा महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. अभिमन्यु पवार, भाजप नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेमधील एकूण ३२ सदस्यांचा सहभाग होता. लातूर जिल्हा परिषदेमध्ये दि. १६ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीने सत्ता स्थापनेची रणनीती आखण्यासाठी आणि सर्व सदस्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
बैठकीदरम्यान उपस्थित सर्व ३२ सदस्यांनी एकत्रितपणे राहून महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी प्रभावी काम करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी केले.
या बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिलीपकुमार मटके यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेतील गटनेते रामचंद्र तिरुके यांनी मानले.या बैठकी मुळे महायुतीच्या सर्व नेत्यांकडून सत्ता स्थापन करण्यासाठी मनोमिलन झाले अशी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळले.